आठवणींचे जाळे

आठवणींचे विणले जाळे
मोहक तंतू निळे जांभळे
उन्हात नाजूक असे लाकाके
हरेक वेढा विश्व निराळे

स्पर्श सुखावह मऊ मखमली
लखलखणार्‍या त्या रेघांचा
वेध मना मग उगाच लागे
लकाकणार्‍या त्या वेढ्यांचा.

थरारली ती हिरकणी जाळी
डोळाभेट जेव्हा जहाली
भूतकाळाचा काळा कोळी
कणाकणाने पुढ्यात येई

विस्तारले कर मी माझे दोन्ही
विस्मयित मग झाला तोही
वेडावाकडा असे जरीही
आलिंगन मी दिले त्यासही.

द्रुष्टीआड जरी काल लपवला
तरी तोही माझा, तोही माझा.

- केतकी

गझल


गझल कशी लिहावी ती मला कळलीच नाही.
विनंत्यांना माझ्या ती कधी भुललीच नाही.

भराभरा जळाले सरण संसार वणव्यात
काही ओली लाकडे यात जळलीच नाही.

होता नव्हता पसारा मांडला तिच्यासाठी
प्राक्तने का दोघांची कधी जुळलीच नाही.

माझ्याच गुंत्यात आता अडकलो मी पुरता
आयुष्याची वीण मला कधी जमलीच नाही.

भुमिपुत्र

न बळ माझ्या अंगी न कुठला राजयोग,
या बळीराजाच्या नशीबी फक्त वनवासाचा भोग.

सोनेरी त्या हरीणाने पदोपदी मजलाही फसवले,
आक्रोश ऐकूनही माझा न कुणी लक्षमण सरसावले.

लदलदलेल्या अशोकवनात या कैकदा माझी इज्जत लुटली,
बरबटलेल्या लंकेत तेव्हा माझी चिता तेवढी पेटली.

न झाला संहार त्या राक्षसांचा, न केला कुणी त्यांचा निःपात,
आधी त्यांनी खाल्ला आजा, आज सरणावर गेला बाप.

अग्निपरिक्षेच्या दिव्यानंतरतरी गायले गेले सीतेचे स्तवन,
आम्हा भुमिपुत्रांच्या नशिबी आले नुसतेच आत्मदहन.

आज एक गाणं जुन्या मित्रासारखं भेटलं


आज एक गाणं जुन्या मित्रासारखं भेटलं,
एका क्षणात मनाने थेट कॉलेज गाठलं.
बेटं कारमधे जेमतेम पाच मिनीट वाजलं,
पण पूर्वीइतकच आजही ते मनाला भावलं.
सिनेमाचा मला तसा फारसा छंद नव्हता,
हा सिनेमा मात्र मी तीनदा पाहिला होता.
याच्या गळ्यात गळा कधी घालता आला असता,
तर लुब्रा एकटेपणा कधी जवळही फिरकला नसता!


भार

आम्ही दोघ लोळत पडलो होतो बिछान्यात,

                                           डोक्याला डोक टेकवुन, हातात हात घेऊन


ऐकत होतो एकमेकांच्या हृदयाचे ठोके.


जणू त्याचे ठोके चेष्टेने मला म्हणत होते
,
"लग्न मानवलेल दिसतय तुला. चांगलीच जड झालीयेस!"

आणि माझे ठोके काळजीनी म्हणत होते,

"मला तरी एक कारण आहे. तू का थकुन जडावला आहेस?"

त्यानी ते खरेच ऐकले की काय?

 म्हणाला,"भार वहातो आहे तुझ्या काळज्यांचा"

किती गंमत ना?

 मी थकले त्याचा भार वाहून आणि तो थकला माझा भार वाहून.

मी आणि माझा थकलेला क्षण 

मग नुसतच बोलत राहिलो मूकपणे आढ्याकडे एक टक पहात....

त्याचे चेहरे हजार

मन लोह लालबुंद
मन चरचरणारा थेंब

मन साजण मोहक
मन दारुण दाहक

मन स्वप्नांचा बाजार
कधी अशक्त लाचार

मन दिवाभित भित्रा
लाळ घोटणारा कुत्रा

त्याचे हजार विचार
आता मोजता येईना

त्याचे चेहरे हजार
मना एकही भावेना
-केतकी

शब्द मी जे ऐकले ते तू कधी न बोलले

शब्द मी जे ऐकले ते तू कधी न बोलले
वहावणार्या मनास माझ्या तू कधीच का न रोखले?

शब्दात तुझ्या धुंद होत हरवले स्वतःस मी
शब्दात तुझ्या हरवताना दुरावले जगास मी

गुंजले जे शब्द ह्रुदयी गीते मी त्यांची गायली
गाशील ती गीते कधी तू वाट किती मी पाहिली

पुरे हा शब्दांचा खेळ आता, घे काळीज झेल माझे
तुटता ते आर्ततेने पापणीही तुझी ना लवली!

Follow by Email

 
Copyright (c) 2010 शब्दस्पंदन. Design by Wordpress Themes.

Themes Lovers, Download Blogger Templates And Blogger Templates.