भार

आम्ही दोघ लोळत पडलो होतो बिछान्यात,

                                           डोक्याला डोक टेकवुन, हातात हात घेऊन


ऐकत होतो एकमेकांच्या हृदयाचे ठोके.


जणू त्याचे ठोके चेष्टेने मला म्हणत होते
,
"लग्न मानवलेल दिसतय तुला. चांगलीच जड झालीयेस!"

आणि माझे ठोके काळजीनी म्हणत होते,

"मला तरी एक कारण आहे. तू का थकुन जडावला आहेस?"

त्यानी ते खरेच ऐकले की काय?

 म्हणाला,"भार वहातो आहे तुझ्या काळज्यांचा"

किती गंमत ना?

 मी थकले त्याचा भार वाहून आणि तो थकला माझा भार वाहून.

मी आणि माझा थकलेला क्षण 

मग नुसतच बोलत राहिलो मूकपणे आढ्याकडे एक टक पहात....

त्याचे चेहरे हजार

मन लोह लालबुंद
मन चरचरणारा थेंब

मन साजण मोहक
मन दारुण दाहक

मन स्वप्नांचा बाजार
कधी अशक्त लाचार

मन दिवाभित भित्रा
लाळ घोटणारा कुत्रा

त्याचे हजार विचार
आता मोजता येईना

त्याचे चेहरे हजार
मना एकही भावेना
-केतकी

शब्द मी जे ऐकले ते तू कधी न बोलले

शब्द मी जे ऐकले ते तू कधी न बोलले
वहावणार्या मनास माझ्या तू कधीच का न रोखले?

शब्दात तुझ्या धुंद होत हरवले स्वतःस मी
शब्दात तुझ्या हरवताना दुरावले जगास मी

गुंजले जे शब्द ह्रुदयी गीते मी त्यांची गायली
गाशील ती गीते कधी तू वाट किती मी पाहिली

पुरे हा शब्दांचा खेळ आता, घे काळीज झेल माझे
तुटता ते आर्ततेने पापणीही तुझी ना लवली!

भय इथले संपत नाही..मला कळलेले (थोडे अपूर्ण)

>भय इथले संपत नाही...मज तुझी आठवण येते...
>मी संध्याकाळी गातो...तू मला शिकविली गीते...

आज या कातरवेळी मला अनामिक भीती वाटते आहे. (येथे सोबत कुणीही नाही) मला तुझी आठवण येते आहे. तू आज माझ्या जवळ नाहीस पण तू शिकवलेल्या गीतांच्या सहवासात, तू सोबत असल्यासारखे वाटून कदाचित माझे भय दूर होईल.


>हे झरे चंद्र सजणांचे, ही धरती भगवी माया
>झाडांशी निजलो आपण, झाडांत पुन्हा उगवाया

हे झरे, हा चंद्र आणि लालीमा पसरलेल्या आकाशात गुरफटलेली धरा मला तुझी आठवण करून देत आहेत. तू जशी राख होऊन झाडांन मध्ये विखुरलीस तसा मी पण लयास जाईन पुन्हा या जगात यायला. (***दोन ओळी स्वतंत्र वाटताहेत पण त्या तश्या नसाव्यात. त्यातला संबंध लक्षात येत नाही आहे).


>त्या वेळी नाजूक भोळ्या, वारयाला हसवून पळती
>क्षितीजांचे तोरण घेऊन, दारावर आली भरती

या सांजवेळी हा गुदगुल्या करणारा वारा आज स्वतःच हसतो आहे असे वाटते (तुझ्या आठवणीने मन प्रफुल्लीत झाल्यामुळे चोहुकडे आनंदमय वाटते आहे.) वितळणार्या सूर्याचा रसरशीत रंग लेऊन ही समुद्राची भरती जणू आकाशच घेऊन आली आहे.


>तो बोल मंद हळवासा आयुष्य स्पर्शुनी गेला
>सीतेच्या वनवासातील जणू राघव शेला

मैथिलीला श्रीरामाच्या शेल्याच्या नुसत्या स्पर्शानेदेखील ज्याप्रमाणे वनवासाचा विसर पडावा त्या प्रमाणे तुझ्या हळव्या आठवणी माझ्या रुक्ष आयुष्यात हिरवळ आणतात.


>देऊळ पलिकडे तरीही, तुज ओंजळ फुटला खांब
>थरथरत्या बुबूळापाशी, मी उरला सुरला थेंब

आयुष्याचा संपूर्ण टप्पा न गाठता तू मधेच अशी निघून गेलीस (देऊळ म्हणजे वार्धक्य जेथे आपल्या कर्माचे, आयुष्याच्या फळाचे अर्घ्य ओंजळीतून वाहून स्वाः म्हणत स्वतःला मोकळे करायचे असते तसे न करता ते देऊळ यायच्या आधीच तुझ्या ओंजळीने अर्घ्य वाहून टाकले). तुझ्यावीण मी एकटा आणि हळवा झालो आहे.


>संध्येतील कमल फ़ुलासम, मी नटलो श्रृंगाराने
>देहाच्या भवती रिंगण, घालती निळाईत राने

(परंतु) तुझ्या आठवणींनी मला आज तृप्त केले आहे. सायंकाळी फुलून येणार्या कमळासारखा मी पण फुललो आहे. या निशेच्या निळ्या शाईत माखलेली वनराई हळू हळू माझा देह लपेटून घेते आहे.


>स्त्रोत्रात इंद्रिये अवघी, गुणगुणती दु:ख्ख कुणाचे
>हे सरता संपत नाही, चांदणे तुझ्या स्मरणाचे

जरी समाधानी मी आज तुझ्या आठवणीत तरी माझे गात्रन्गात्र तुझ्यासाठी झुरते आहे (ते फक्त तुझाच जप करतात). तुझ्या आठवणी जरी शीतल असल्या तरी तुझी कमतरता सतत जाणवते आहे. (तुझ्या शिवाय हे आयुष्य म्हणजे एक काळी रात्र आणि तुझ्या आठवणी म्हणजे शीतल, चमचमत्या चांदण्या. ही रात्र सरता सरत नाही आहे).


>ते धुके अवेळी होते, की परतायची घाई
>मेंदुतून ढळली माझ्या, निष्पर्ण तरुंची राई


 
Copyright (c) 2010 शब्दस्पंदन.