सावली

 आज माझ्या सावलीने

मला खिन्नपणे हसवले

रोज पडते स्वप्नासारखी

ज्यानी मला भुलवले


कुणीच नाही म्हटल्यावर

वाट कुणाची पहावी?

मग तिच्याच येण्याची

वाट बघत रहावी


अग ती तर असणारच

ती जातेच पुन्हा येण्यासाठी

असेच गेलेल्या येणार्यांची

मी उरले वाट बघण्यासाठी


वाट बघुन कोणी आले असते तर

मीही गेले असते कोणाजवळ

रोजच पडणार्या सावलीला

कसेनुसे हसते केवळ


-केतकी

चकवा

एकदा तो घरी आला

मला म्हणाला चल.

मी पण तडक उठले

आणि म्हणाले चल


तो म्हणाला अशीच येणार?

निदान तपासुन बघ खिडक्या दार.

मी म्हणाले काय तपासु?

आत नेण्यासारखं नाही फार.


तो म्हणाला एकदा सगळं बघुन घे

नाहीतर रडत माघार घेशील रस्त्यातुन.

मी म्हणाले रडेन खरं

पण डोळे पुसल्यावर बघणार नाही वळुन.


तेव्हापासुन तो मला घेऊन चालत आहे

मी माघार घेण्याची वाट बघत.

मीही त्याच्या मागुन चालते आहे

अजुन आला नाही थकवा 

आयुष्याला लागलेला हा न संपणारा चकवा!


- केतकी

नको न ग

 नको न ग हसू खोटं हसल्यासारखं

सगळ्यांमधे नसुनही असल्यासारखं.


अर्ध आयुष्य गेलं, थकली असशील 

थकून थोडावेळ बसली असशील

नको न ग बसु गळल्यासारखं

कळूनही मनाला न वळल्यासारखं


मान्य मला तू खूपदा मन मारलं असशील

हरवलेल्या स्वत:ला वारंवार शोधलं असशील

नको न ग वागू सर्वस्व गमवल्यासारखं

पोटात भुक असूनही उबगल्यासारखं


घराच्या पसार्यात अडकली असशील

नभाकडे असुयेने रोज बघत  असशील

नको न ग करू पाठ फिरवल्यासारखं

कुठेतरी खोल जिव्हारी लागल्यासारखं


अर्ध आयुष्य अजुन बाकी आहे जवळपास

मिळेल जिव्हाळ्याचा स्पर्श, कौतुक आणि तो सहवास

नको न ग बसु असं रुसल्यासारखं

आयुष्याची वाट कायमची चुकल्यासारखं


येईल असाही क्षण जेव्हा हे फास कमजोर पडतील 

पायातील बेड्यांच्या किल्ल्या तुझ्या हातात असतील 

झेपावशील न ग तेव्हा मुक्त बेभान पक्षिणीसारखी?

जगशील न ग तेव्हा माझ्या जुन्या मैत्रिणीसारखी?


- केतकी

संध्या

 रंगांवरती रंग बरसले

मनात धुमसे जणु ही बया

क्रोधित झाली संध्याराणी

क्षितिजाचीही बदले रया


लाटांमागुन आल्या लाटा 

किनार्यास आज मनवाया

उशीर झाला त्यांस यावया

बदलुन गेल्या दोन्ही काया


थंड उसासे मधेच टाके 

दुखावलेली सर्द हवा

हातातील वाळू सरसावे 

त्यावर फुंकर घालाया.


विशाल देखणे दृश्य ठेवले

तू मजपुढे का मी हरवाया?

कर्मकरंटे मीपण माझे 

नकार देई विसराया. 


-केतकी

कोण काय म्हणतं?


निराशावादी म्हणे खरा आशावादी असतो,
काहीतरी बदलेल म्हणुन बडबडत असतो.
ती बडबड बंद झाली तर काय समजावे?
त्याच्या आशा खर्या झाल्या की तो खरच निराश झाला?

गरीब माणुस म्हणे खरा श्रीमंत असतो,
जवळ काही नसतानाही खिस्यात हात घालतो.
त्याचा हात पुढे आला नाही तर काय समजावे?
तो पुरता कंगाल झाला की त्याचे खिस्याने त्याचा हात धरला?

मैत्री मधे म्हणे सारं न बोलताही कळत
दररोजच्या रगाड्यात न भेटताही प्रेम उरत
मित्र जेव्हा भेटतात आणि शब्दच निघत नाही
तेव्हा काय समजावे?
न बोलता संवाद झाला की बोलायला काहीच उरले नाही?

कोण काय म्हणेल म्हणुन मन घाबरत असत
पुढे काय होईल त्याला ठाऊक नसत
जगण्यातली ही अनामिक भिती निघुन गेली
तर काय समजावे?
सारी स्वप्नं पूर्ण झाली की स्वप्नच पडेनाशी झाली?

- केतकी

मोगर्‍याचा गंध

माझ्या रुमालामध्ये
उरला मोगर्याचा  गंध
त्याच्या सुवासाचा मला
लागला आगळाच छ्न्द

जणू सारे मर्मबन्ध
मोगर्याचा  हा सुगंध
जणू माझ्यातला मी
रित्या देहात हा बंद

रुमालातला हा गंध
कधी माझ्यातली शक्ती
कधी फाटले आकाश
उरे तुझीच रे भक्ती

-केतकी

 
Copyright (c) 2010 शब्दस्पंदन.