भुमिपुत्र

न बळ माझ्या अंगी न कुठला राजयोग,
या बळीराजाच्या नशीबी फक्त वनवासाचा भोग.

सोनेरी त्या हरीणाने पदोपदी मजलाही फसवले,
आक्रोश ऐकूनही माझा न कुणी लक्षमण सरसावले.

लदलदलेल्या अशोकवनात या कैकदा माझी इज्जत लुटली,
बरबटलेल्या लंकेत तेव्हा माझी चिता तेवढी पेटली.

न झाला संहार त्या राक्षसांचा, न केला कुणी त्यांचा निःपात,
आधी त्यांनी खाल्ला आजा, आज सरणावर गेला बाप.

अग्निपरिक्षेच्या दिव्यानंतरतरी गायले गेले सीतेचे स्तवन,
आम्हा भुमिपुत्रांच्या नशिबी आले नुसतेच आत्मदहन.
 
Copyright (c) 2010 शब्दस्पंदन.