आयुष्य झालंय गोल गोल


आयुष्य झालंय गोल गोल
ना शेंडा ना बुडाखा
ना मायेचा कोपरा
शंकांचा नुसता कल्लोळ
आयुष्य झालंय गोल गोल...

आयुष्य झालंय गोल गोल
कशातही मिसळा

कशातुनही वगळा
असणे नसणे मातीमोल
आयुष्य झालंय गोल गोल...

आयुष्य झालंय गोल गोल
भडकलेला आतुर जाळ
तहानलेले गच्च आभाळ
विहीर अंधारी खोल खोल
आयुष्य झालंय गोल गोल...


एवढेच...

हृदयाला पीळ पाडणारे हात माझेच होते,
पिळवटलेले हळवे हृदयही माझेच होते.
चुकले कधी जरी आपलीच म्हणशील तरीही,
भयमुक्त उब कवेची, मना, मागणे एवढेच आहे.
तत्व, उम्बरठे, आदर्श या पलीकडे एक मीही आहे.
मनमुकत श्वास सुखाचा, मना, जगणे एवढेच आहे.

- केतकी

आठवणींचे जाळे

आठवणींचे विणले जाळे
मोहक तंतू निळे जांभळे
उन्हात नाजूक असे लाकाके
हरेक वेढा विश्व निराळे

स्पर्श सुखावह मऊ मखमली
लखलखणार्‍या त्या रेघांचा
वेध मना मग उगाच लागे
लकाकणार्‍या त्या वेढ्यांचा.

थरारली ती हिरकणी जाळी
डोळाभेट जेव्हा जहाली
भूतकाळाचा काळा कोळी
कणाकणाने पुढ्यात येई

विस्तारले कर मी माझे दोन्ही
विस्मयित मग झाला तोही
वेडावाकडा असे जरीही
आलिंगन मी दिले त्यासही.

द्रुष्टीआड जरी काल लपवला
तरी तोही माझा, तोही माझा.

- केतकी

 
Copyright (c) 2010 शब्दस्पंदन.