सहप्रवासाचे अर्धशतक

 तुमच्या सहप्रवासाचे अर्धशतक,

हा सोहळा आहे आठवणींचा...

शुभचिंतन लाभले मित्रपरिवाराचे,

दिवस आहे हा सोन्याचा!


आयुष्याची सुरुवातीची वर्षे,

तुम्ही मिळून सुंदर स्वप्ने पाहिली...

एकमेकांना जाणून घेत,

एक नवीन उमेद जागवली.


पुढचे दिवस कष्टाचे होते,

तुम्ही पाठीवरती जणू सूर्य घेतला...

इवल्या इवल्या रोपट्यांसाठी,

सावलीचा वसा घेतला.


पिल्लांना नवे जग देताना,

तुम्ही कष्टाने सुंदर आयुष्य उभारले...

आलेल्या अनपेक्षित वादळाशी,

मिळून दोन हात केले.


तुमच्या परिश्रमाचे आणि सचोटीचे,

आम्ही सारे साक्षी आहोत...

तुमच्या पोटी जन्म लाभला,

आम्ही किती भाग्यवान आहोत!


तुमचा हा कृतार्थ जीवनप्रवास,

आमच्यासाठी प्रेरणादायी आहे...

त्यातील अंश घेऊन आता,

ही छोटी रोपटी वृक्ष बनू पाहत आहे.


असे आनंदाचे सोहळे साजरे करण्यात,

आम्हाला मनापासून अभिमान वाटतो...

तुमच्या भोवतीचा मित्रपरिवार पाहून,

आम्ही समाधानाने तृप्त होतो.


हे सुखाचे क्षण तुमच्या आयुष्यात वारंवार यावेत,

ही ईश्वरचरणी प्रार्थना आहे...

आमचे आमंत्रण स्वीकारून आपण सर्व आलात,

याबद्दल मी आपली मनापासून आभारी आहे!

 
Copyright (c) 2010 शब्दस्पंदन.