आठवणींचे जाळे

आठवणींचे विणले जाळे
मोहक तंतू निळे जांभळे
उन्हात नाजूक असे लाकाके
हरेक वेढा विश्व निराळे

स्पर्श सुखावह मऊ मखमली
लखलखणार्‍या त्या रेघांचा
वेध मना मग उगाच लागे
लकाकणार्‍या त्या वेढ्यांचा.

थरारली ती हिरकणी जाळी
डोळाभेट जेव्हा जहाली
भूतकाळाचा काळा कोळी
कणाकणाने पुढ्यात येई

विस्तारले कर मी माझे दोन्ही
विस्मयित मग झाला तोही
वेडावाकडा असे जरीही
आलिंगन मी दिले त्यासही.

द्रुष्टीआड जरी काल लपवला
तरी तोही माझा, तोही माझा.

- केतकी

No comments:

 
Copyright (c) 2010 शब्दस्पंदन.