कळून वळेना

पायाखालच्या वाटेलाही पाय एकदा फुटले
तोल माझा जाऊन डोळ्यातले अश्रू धावत सुटले


स्वप्नांनाही पडली स्वप्नं स्वप्नांच्या दुनियेची
पायाखालच्या वाटेला सोडून दूर गगनी उडायची
 
मन मात्र मनापासून स्वप्नं खरी मानेना
गुडघ्यात घातलेली मान वर काही काढेना 

कोणाची घालू समजूत हे माझेच मला समजेना 
माझेच आहेत हे खेळ सारे कळूनही मला वळेना

अन्धेरनगरी


अन्धेरनगरीचा चौपट राजा,
राजापेक्षा येथे सल्लागाराचा गाजावाजा 
राजाच्या हातात सत्तेचे नुसतेच गाजर 
सल्लागाराच्या वंशावळीची सत्तेवर नजर.

अंधेरनगरीत एकदा व्यापाराला आला उत
मंत्र्या-संत्र्यांनी केली दोन्ही हातानी लूट.
पोटा साठी राबणारा येथे राब राब राबणार,
त्याच्या नशिबी मात्र दररोजचे मरण येणार.

प्रजा म्हणे 'मी एकटा तरी काय करणार?
माझा कोणी मरत नाही तोवर मी नाही पहाणार.'
अंधेरनगरीत काही जणांची मात्र झोप उडाली,
त्यांनी सरळ दुसरी नगरी गाठली.

अंधेर नगरीच्या प्रजेचेही डोके पडले गहाण,
या अराजकातही म्हणे 'मेरा भारत महान!'

सुखसोयींचा पाठलाग

'सुखसोयी' हा शब्द आपण सहज एकत्र म्हणतो,
Facebook ची सोय असताना कट्ट्याचे सुख शोधतो.
Email ची सोय असूनही पत्रासाठी झुरतो,
हातात coke असताना कटिंगचे स्वप्न पहातो.

सोय आणि सुखाचा पाठलाग पाहून मला कुत्रा आणि शेपूट आठवते. 
सोय शिताफीने सुख धरायला जाते 
आणि सुख तेवढ्याच चपळाईने निसटते.

आई-बाबांचे म्हणणे मग आठवते पदोपदी
'तुमच्या सारख्या सोयी नसल्या तरीही, बाळांनो,
 होतो आम्ही भरपूर सुखी.'
आम्हीही आमच्या बाळांना हेच सांगणार,
'सोयींच्या या गर्दीत, बाबांनो, सुख नाही गवसणार.'

आजोबांची कवळी


आजोबांची कवळी सहसा डब्या मधेच रमे
तिला हवा लागणार कळताच नातवंडांची गर्दी जमे.
कवळी कडे पहात असे ती डोळे विस्फारत 
आजोबाही ते पाहून मिस्कीलपणे हसत.

आजही कोणी कवळीचे नाव घेता आठवतो तो कावळ्यांचा डब्बा
आणि आठवतात मिस्कीलपणे हसत असलेले आमचे आजोबा!

वाताहत

हरवलेल्या गोष्टींच्या शोधात वेडे मन इतके धावले
की गवसलेल्या गोष्टींचा पायाखाली चुराडा झाल्याचे कळलेही नाही.
काही तुडवलेल्या गोष्टींना इतका तडा गेला आहे
की कुठला तुकडा कोणाचा हे सुद्धा आता ओळखू येत नाही.
 
Copyright (c) 2010 शब्दस्पंदन.