माझ्या शब्दांनो


शब्दांनो, कधी जमले तर करा तुमच्या आयुष्याची गोळाबेरीज.
जरा बघा तरी काय झाले तुमच्या अयुष्याचे चीज.
माझ्यासारखे शरीर मिळले तुम्हास  कधीजर का,
तर मारुन या कधी तुम्ही वसवलेल्या जगाचा फेरफटका.

दिसेल तुम्हाला एक  घर चिमुकले,
तुमच्या हुंकरांनी लिंपलेले,
अंगणात सजली असेल तुमच्या बडबडगीतांची रांगोळी,
घरातल्या प्रत्येक तसबीरीत साठवली असेल तुमची आरोळी.

सप्तरंगी पायवाटेवरुन असे जर गेलात समोर तर दिसेल तुम्हाला एक बाग.
प्रेमात घेतलेल्या आणाभाकान्नी चढवला असेल तिला  साज.
फुलली असतील त्यात तुमची वचने, मित्रांसोबत गायलेले गाणे,
रंगलेल्या गप्पा, हसणे, खिदळणे आणि क्वचित रुसणे फुगणे.

दर्यांमधे दिसेल रान नटलेले,
रानामधले प्रत्येक पान दवानी चिंब भिजलेले.
वसतात तेथे तुम्ही केलेली कौतुके, आदरोद्गार काढलेले,
तुम्ही केलेला जल्लोष, तुमचे धीराचे हात पाठीवरुन फिरलेले.


त्या डोंगरा पलिकडे आहे एक मोकळे मैदान.
नेहमीच नव्हते ते एवढे रूक्ष.
ती कापलेली खोडे दिसताहेत ना? तिथे होती बरीच वृक्ष.
नांदत होते इथेही बरेच जीव, माजली होती इथे वृक्षावल्ली.
काय करणार पण त्यांची रीत तुम्हाला नाही पटली.
एक दिवस सारी वनराई तुम्ही ऐसी दणाणुन सोडली,
एक एक करत करवतीने तुम्ही हरेक फांदी छटुन काढली.
जगाची रीतच ती, काय करणार? इथेच थोडावेळ थांबणार की पुढेही चालणार?


पुढे दिसताहेत का ती गिधाडे घालताना रिन्गण?
तिथे आहे तुम्ही गाजवलेले रणांगण.
येथे जे विव्हळत पडले यातले काही आहेत तुमच्यापैकीच,
पाजळल्या तुम्ही येथे तलवारी विजयाच्या कैफीत.
गलीतगात्र झाले काही, कधी वाटेत तेही भेटतील.
त्यावेळेस मात्र त्यांच्या खंजीरी थेट हृदयाचा ठाव घेतील.

काय म्हणता? सहन होत नाही हे विव्हळणे? पायातले त्राण गाळाले?
हळूवार घ्या श्वास, बसा क्षणभर त्या कड्या मागे.
येथुन दिसतील तुम्हाला नदीच्या हिरकणी लाटा,
वितळुन पसरणारा रवी आणि त्याच्या असंख्य छ्टा.
या दृश्यांच्या कवेतच मिळेल तुम्हास मुक्ती.
आमच्या सारखे जीव मात्र या सुटकेस मुकती.





No comments:

 
Copyright (c) 2010 शब्दस्पंदन.