नको न ग हसू खोटं हसल्यासारखं
सगळ्यांमधे नसुनही असल्यासारखं.
अर्ध आयुष्य गेलं, थकली असशील
थकून थोडावेळ बसली असशील
नको न ग बसु गळल्यासारखं
कळूनही मनाला न वळल्यासारखं
मान्य मला तू खूपदा मन मारलं असशील
हरवलेल्या स्वत:ला वारंवार शोधलं असशील
नको न ग वागू सर्वस्व गमवल्यासारखं
पोटात भुक असूनही उबगल्यासारखं
घराच्या पसार्यात अडकली असशील
नभाकडे असुयेने रोज बघत असशील
नको न ग करू पाठ फिरवल्यासारखं
कुठेतरी खोल जिव्हारी लागल्यासारखं
अर्ध आयुष्य अजुन बाकी आहे जवळपास
मिळेल जिव्हाळ्याचा स्पर्श, कौतुक आणि तो सहवास
नको न ग बसु असं रुसल्यासारखं
आयुष्याची वाट कायमची चुकल्यासारखं
येईल असाही क्षण जेव्हा हे फास कमजोर पडतील
पायातील बेड्यांच्या किल्ल्या तुझ्या हातात असतील
झेपावशील न ग तेव्हा मुक्त बेभान पक्षिणीसारखी?
जगशील न ग तेव्हा माझ्या जुन्या मैत्रिणीसारखी?
- केतकी