संध्या

 रंगांवरती रंग बरसले

मनात धुमसे जणु ही बया

क्रोधित झाली संध्याराणी

क्षितिजाचीही बदले रया


लाटांमागुन आल्या लाटा 

किनार्यास आज मनवाया

उशीर झाला त्यांस यावया

बदलुन गेल्या दोन्ही काया


थंड उसासे मधेच टाके 

दुखावलेली सर्द हवा

हातातील वाळू सरसावे 

त्यावर फुंकर घालाया.


विशाल देखणे दृश्य ठेवले

तू मजपुढे का मी हरवाया?

कर्मकरंटे मीपण माझे 

नकार देई विसराया. 


-केतकी

कोण काय म्हणतं?


निराशावादी म्हणे खरा आशावादी असतो,
काहीतरी बदलेल म्हणुन बडबडत असतो.
ती बडबड बंद झाली तर काय समजावे?
त्याच्या आशा खर्या झाल्या की तो खरच निराश झाला?

गरीब माणुस म्हणे खरा श्रीमंत असतो,
जवळ काही नसतानाही खिस्यात हात घालतो.
त्याचा हात पुढे आला नाही तर काय समजावे?
तो पुरता कंगाल झाला की त्याचे खिस्याने त्याचा हात धरला?

मैत्री मधे म्हणे सारं न बोलताही कळत
दररोजच्या रगाड्यात न भेटताही प्रेम उरत
मित्र जेव्हा भेटतात आणि शब्दच निघत नाही
तेव्हा काय समजावे?
न बोलता संवाद झाला की बोलायला काहीच उरले नाही?

कोण काय म्हणेल म्हणुन मन घाबरत असत
पुढे काय होईल त्याला ठाऊक नसत
जगण्यातली ही अनामिक भिती निघुन गेली
तर काय समजावे?
सारी स्वप्नं पूर्ण झाली की स्वप्नच पडेनाशी झाली?

- केतकी

मोगर्‍याचा गंध

माझ्या रुमालामध्ये
उरला मोगर्याचा  गंध
त्याच्या सुवासाचा मला
लागला आगळाच छ्न्द

जणू सारे मर्मबन्ध
मोगर्याचा  हा सुगंध
जणू माझ्यातला मी
रित्या देहात हा बंद

रुमालातला हा गंध
कधी माझ्यातली शक्ती
कधी फाटले आकाश
उरे तुझीच रे भक्ती

-केतकी

फरकच पडत नाही फारसा

आजकाल मन खट्टु होत नाही फारसं.
मी झाले नाही मदर टेरेसा ,
पण फरकच पडत नाही फारसा.
आजकाल मन लट्टुही होत नाही फारसं
रंगुन जावं रंगात, राग जरा लटकासा.
पण फरकच पडत नाही फारसा.
शोधावे स्वत:ला की हरवावे स्वत:ला?
चालवावा हॅमलेटचा वारसा,
जाऊ दे, फरकच पडत नाही फारसा.
कुठे वणवा पेटला की भरून आले आभाळ?
उजेड काळवंडला आहे जरासा.
आजकाल त्यालाही फरकच पडत नाही फारसा.
- ketaki

तुझी मैत्री

कडकीत सापडलेले गांधी,
झोपताना मिळालेली परफ़ेक्ट उशी,
पारा उडालेला पण ठसठशीत रुप दाखवणारा आरसा,
चोरुन कुंपण ओलांडताना लागलेला खोचा,
पाऊस पडत नसतानाही सोबत घेतलेली छत्री,
म्हणजे तुझी मैत्री, तुझी मैत्री!

एक स्टोरी

प्रत्येकाची एक स्टोरी
बरेचदा जुनी कधीकधी नवीकोरी.
प्रत्येक स्टोरीत एक व्हिलन
कधी खरा कधी आपलेच आपण.
'माझाही दिवस येईल' म्हणत खर्यापुढे शरण,
कोणी व्हिलन नसताना आप्तांमधेच दिसतो रावण.
नशीब असेल तर भरतील जखमा पालीच्या शेपटी गत,
दहा डोकी चिपकतील धडाला हसतील पुन्हा गडगडत.

बहाणा

जातं फिरतंय रव रव रव
धान्य परत परत भरडुन निघतंय त्यातुन
नकोसा झालाय तो कर्कश भरडण्याचा आवाज
पण तेवढच एक चिन्ह उरलंय जिवंतपणाचं.

उन्हाने झाली आहे लाही लाही
पाखरांच्याही जिभा आत बाहेर होताहेत
नकोसं झालं आहे ते रापणं आणि करपणं
पण तेवढच एक लक्शण उरलंय उजेड असण्याचं.

पावसाचा अचानक बसलेला तडाखा
पुरात सापडला आहे बेसावध आसमंत
नकोसा झालाय हा पावसाचा कडेलोट
पण तेवढाच एक बहाणा राहिला आहे धाय मोकलुन रडण्याचा.

बॅक बेंचर

जरीही वाटत असु निकम्मे
आमुच्या वाचुन वर्ग रिकामे
हर एक दिन नवीन एढव्हेंचर
आम्ही आहोत बॅक बेंचर.
आमच्यामुळे वर्गास प्रसिद्धी
शिक्शा भोगुन आम्ही जिद्दी
शिक्शकांचे आम्ही चॅलेंजर
हरहुन्नरी बॅक बेंचर!
एक सांगितले दुसरे करणार
वाट अडवली तर टक्कर घेणार
कर असुनही नाही डर
निर्भिड निडर बॅक बेंचर!
म्हणे आम्हा फुकाच माज
नाही शिस्त नाही लाज
मस्ती खोड्या हेच हर प्रहर
मार खातो बॅक बेंचर.
नाही आम्ही एवढेही वाईट
मुक्त जगण्याची आमची फाईट
आली लहर की केला कहर
निर्बंध आम्ही बॅक बेंचर!

असंच


चाय की प्याली मे जो बवंडर उठा
उसे सैलाब समझ बैठे
जहा कड़वाहट निगलनी थी
वहा कश्ती डुबो बैठे...

खाली झोली देखके
कभी रोये थे हम
अब उसीके बोझ से
दम निकल रहा है...

आँखे मिंच जिन सिक्कोंको
पानीमे फेंका था हमने
कहा पता था
वही सपनोंका बहाना थे...

अंतर

खुणावले तू मला
म्हणालास मी तिथे,
पोहोचले जेव्हा तिथे
होतास तू थोडाच पुढे

पोहचेन  कधी तिथे
या ध्येयाने निघाले
जरा पुढे जरा पुढे
अगदी पोहोचलेच तिथे 

फक्त न पोहोचले केव्हा तिथे
नेहमी होतास तू जरा पुढेच
अंतर युगांचे कापले मी,
डोळ्यांपुढे होतास तू
जरा पुढे अगदी तिथे

-केतकी

काकाजी अन् अमेरिकेतला बाल्या

एक काकाजी मले म्हनाले, का बे बाल्या काउन?
देशाले सोडून गेला बे तू भगून.

तेथं राहून तू बोम्बलते हितं पैसा खातेत,
तुया अमेरिकेत लोकं तशीच का बे रायतेत?

महंगाई वाढली म्हनून बेट्या दुरुनच चिल्लावते,
रुपया बाजारात पडला तर तुहे दोडे चमकतेत.

कानून नाई म्हन्ते देशात, खरं सांगत असशीन,
तुया अमेरिकेतल्या रेप केशीश तू कवा गिनशील?

जवा पावं तवा म्हन्ते देश चाल्ला खड्ड्यात,
आमाला तेवढी नैतिकता अन् तुम्ही लोटा इलासात.

मीनी बी मंग म्हन्लं, काकाजी, खरं बोलता गा,
रिजर्वेश्न जमान्यात द्या एकादी जागा.

आत्तापातुर जात-धर्म आडवा येत व्हता निस्ता,
आता मराटी बोलतो म्हनून खातो खस्ता.

हितं बी नेते सपाटुन पैसा खातेत,
मायासारख्याच्या पोटावर पन पाय नाई येत.

आठवत असन तुमाले तं डालर बी पडला व्हता,
म्हनून लोकानी देश धा वर्ष मागे लोटला नव्हता.

लोक कमी अन् केशीश जास्त, काकाजी, तुमी बोलता खरं,
पन शिक्शेनंतर हितं हालत अशी का मानुस दिसते जिता पन असतं निस्तच मढं.

काकाजी, जवापर्यंत देशाशी इमान असनार तवापर्यंत बोंबलनार,
जवा का बोंबलनं खतम झालं तवा देशाचं लेकरू नाई म्हनवनार.

- केतकी

आयुष्य झालंय गोल गोल


आयुष्य झालंय गोल गोल
ना शेंडा ना बुडाखा
ना मायेचा कोपरा
शंकांचा नुसता कल्लोळ
आयुष्य झालंय गोल गोल...

आयुष्य झालंय गोल गोल
कशातही मिसळा

कशातुनही वगळा
असणे नसणे मातीमोल
आयुष्य झालंय गोल गोल...

आयुष्य झालंय गोल गोल
भडकलेला आतुर जाळ
तहानलेले गच्च आभाळ
विहीर अंधारी खोल खोल
आयुष्य झालंय गोल गोल...


एवढेच...

हृदयाला पीळ पाडणारे हात माझेच होते,
पिळवटलेले हळवे हृदयही माझेच होते.
चुकले कधी जरी आपलीच म्हणशील तरीही,
भयमुक्त उब कवेची, मना, मागणे एवढेच आहे.
तत्व, उम्बरठे, आदर्श या पलीकडे एक मीही आहे.
मनमुकत श्वास सुखाचा, मना, जगणे एवढेच आहे.

- केतकी

आठवणींचे जाळे

आठवणींचे विणले जाळे
मोहक तंतू निळे जांभळे
उन्हात नाजूक असे लाकाके
हरेक वेढा विश्व निराळे

स्पर्श सुखावह मऊ मखमली
लखलखणार्‍या त्या रेघांचा
वेध मना मग उगाच लागे
लकाकणार्‍या त्या वेढ्यांचा.

थरारली ती हिरकणी जाळी
डोळाभेट जेव्हा जहाली
भूतकाळाचा काळा कोळी
कणाकणाने पुढ्यात येई

विस्तारले कर मी माझे दोन्ही
विस्मयित मग झाला तोही
वेडावाकडा असे जरीही
आलिंगन मी दिले त्यासही.

द्रुष्टीआड जरी काल लपवला
तरी तोही माझा, तोही माझा.

- केतकी

गझल


गझल कशी लिहावी ती मला कळलीच नाही.
विनंत्यांना माझ्या ती कधी भुललीच नाही.

भराभरा जळाले सरण संसार वणव्यात
काही ओली लाकडे यात जळलीच नाही.

होता नव्हता पसारा मांडला तिच्यासाठी
प्राक्तने का दोघांची कधी जुळलीच नाही.

माझ्याच गुंत्यात आता अडकलो मी पुरता
आयुष्याची वीण मला कधी जमलीच नाही.

भुमिपुत्र

न बळ माझ्या अंगी न कुठला राजयोग,
या बळीराजाच्या नशीबी फक्त वनवासाचा भोग.

सोनेरी त्या हरीणाने पदोपदी मजलाही फसवले,
आक्रोश ऐकूनही माझा न कुणी लक्षमण सरसावले.

लदलदलेल्या अशोकवनात या कैकदा माझी इज्जत लुटली,
बरबटलेल्या लंकेत तेव्हा माझी चिता तेवढी पेटली.

न झाला संहार त्या राक्षसांचा, न केला कुणी त्यांचा निःपात,
आधी त्यांनी खाल्ला आजा, आज सरणावर गेला बाप.

अग्निपरिक्षेच्या दिव्यानंतरतरी गायले गेले सीतेचे स्तवन,
आम्हा भुमिपुत्रांच्या नशिबी आले नुसतेच आत्मदहन.

आज एक गाणं जुन्या मित्रासारखं भेटलं


आज एक गाणं जुन्या मित्रासारखं भेटलं,
एका क्षणात मनाने थेट कॉलेज गाठलं.
बेटं कारमधे जेमतेम पाच मिनीट वाजलं,
पण पूर्वीइतकच आजही ते मनाला भावलं.
सिनेमाचा मला तसा फारसा छंद नव्हता,
हा सिनेमा मात्र मी तीनदा पाहिला होता.
याच्या गळ्यात गळा कधी घालता आला असता,
तर लुब्रा एकटेपणा कधी जवळही फिरकला नसता!


भार

आम्ही दोघ लोळत पडलो होतो बिछान्यात,

                                           डोक्याला डोक टेकवुन, हातात हात घेऊन


ऐकत होतो एकमेकांच्या हृदयाचे ठोके.


जणू त्याचे ठोके चेष्टेने मला म्हणत होते
,
"लग्न मानवलेल दिसतय तुला. चांगलीच जड झालीयेस!"

आणि माझे ठोके काळजीनी म्हणत होते,

"मला तरी एक कारण आहे. तू का थकुन जडावला आहेस?"

त्यानी ते खरेच ऐकले की काय?

 म्हणाला,"भार वहातो आहे तुझ्या काळज्यांचा"

किती गंमत ना?

 मी थकले त्याचा भार वाहून आणि तो थकला माझा भार वाहून.

मी आणि माझा थकलेला क्षण 

मग नुसतच बोलत राहिलो मूकपणे आढ्याकडे एक टक पहात....

त्याचे चेहरे हजार

मन लोह लालबुंद
मन चरचरणारा थेंब

मन साजण मोहक
मन दारुण दाहक

मन स्वप्नांचा बाजार
कधी अशक्त लाचार

मन दिवाभित भित्रा
लाळ घोटणारा कुत्रा

त्याचे हजार विचार
आता मोजता येईना

त्याचे चेहरे हजार
मना एकही भावेना
-केतकी

शब्द मी जे ऐकले ते तू कधी न बोलले

शब्द मी जे ऐकले ते तू कधी न बोलले
वहावणार्या मनास माझ्या तू कधीच का न रोखले?

शब्दात तुझ्या धुंद होत हरवले स्वतःस मी
शब्दात तुझ्या हरवताना दुरावले जगास मी

गुंजले जे शब्द ह्रुदयी गीते मी त्यांची गायली
गाशील ती गीते कधी तू वाट किती मी पाहिली

पुरे हा शब्दांचा खेळ आता, घे काळीज झेल माझे
तुटता ते आर्ततेने पापणीही तुझी ना लवली!
 
Copyright (c) 2010 शब्दस्पंदन.